यासीन शिकलकर अकलूज 9923990090
अकलूज (प्रतिनिधी) : पंढरपुरमधील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष, धडाडीचे समाजसेवक गणेश अंकुशराव यांना साहित्यरत्न गुणगौरव पुरस्कार प्रदान करुन सन्मानीत करण्यात आले. अजनसोंड, ता. पंढरपूर येथे लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी वस्ताद ग्रुप (एल.व्ही. ग्रुप) यांच्या वतीने आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला.
गणेश अंकुशराव हे गेल्या अनेक वर्षांपासुन तळागाळातील सर्वसामान्य, शोषीत, वंचीत घटकांना न्याय देण्याचे कार्य करत आहेत. विशेषत: आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. पंढरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील सोयी, सुविधा, चंद्रभागेच्या पात्राची स्वच्छता यासह शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आपल्या स्टाईलने केलेल्या अनोख्या आंदोलनांची चर्चा राज्यभर होत असते. चंद्रभागेच्या वाळवंटातील बेवारस प्रेतांची विटंबना होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करणे यासोबतच पंढरीत बेवारस आढळुन आलेल्या अंध,अपंग, मतीमंद, वृध्द, लहान मुलं, मुली याबाबत माहिती मिळताच किंवा आढळुन आल्यास तातडीने त्यांची विचारपुस करुन त्यांना धीर देऊन अन्न-पाणी देऊन त्यांना प्रशासनाकडे सुपूर्त करण्याचे कार्यही गणेश अंकुशराव सातत्याने करत आहेत.
गणेश अंकुशराव यांच्या वरील कार्याची दखल घेऊन एल.व्ही. ग्रुपच्या वतीने अभिराज उबाळे यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी दलितमित्र नानासाहेब वाघमारे, कार्यक्रमाचे आयोजक, एल.व्ही. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष समाधान वायदंडे, श्रीकांत कसबे, भगवान वानखेडे, धनाजी वाघमारे, रामभाऊ सुरवसे, गुरु दोडीया, किशोर खिलारे, राजाभाऊ मिसाळ, शिक्षणाधिकारी बिभीषण रणदिवे, सुनील अडगळे गुरुजी, दादासाहेब भुसे आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्ता कांबळे सर यांनी केले, प्रास्ताविक लक्ष्मण बंगाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन समाधान वायदंडे यांनी केले.